डॉ. मनमोहन सिंग

डॉ. मनमोहन सिंग

भारतातील आर्थिक व सामाजिक संक्रमणाचा वेध घेणाऱ्या ‘स्पर्धा काळाशी’ या अरुण टिकेकर संपादित या शरद पवारांच्या भाषणांच्या पुस्तकात माजी पंतप्रधान माननीय डॉ. मनमोहन सिंग म्हणतात,

  ‘आर्थिक सुधारणा आणि उदारीकरण कार्यक्रमास १९९१ साली आम्ही जो प्रारंभ केला त्या संदर्भात शरदजींच्या असलेल्या बांधीलकीचे मला स्मरण होते. किंबहुना, आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण घडवून आणण्यासाठी १९८० च्या दशकात राजीव गांधी यांनी उचललेल्या अनेक धाडसी पावलांना शरदजींनी पाठिंबाच दर्शविला होता.

महाराष्ट्राच्याही पलिकडे- राजकारण आणि सार्वजनिक जीवनाच्या प्रांतात- राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यापक अनुभव शरदजींच्या पाठीशी आहेत. अनेक बाबतींतील त्यांच्या भूमिकेशी सुसंवादी अशीच माझी भूमिका असते. विशेषत: आर्थिक धोरण, सातत्यशील विकास आणि आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक बाबी यांचा निर्देश यासंदर्भात करता येईल. आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाचे उपयोजन राष्ट्रीय विकासासाठी करण्याबाबत दृढबांधिलकी असणाऱ्या आमच्या काही अत्यंत प्रगल्भ नेत्यांमध्ये शरदजींची गणना होते.

एक आर्थिक महासत्ता म्हणून भारत उदयास येऊ शकतो या त्यांच्या मताशी मी सहमत आहे.

अन्न व कृषी खात्याचे केंद्रीय मंत्री या नात्याने आमच्या मंत्रिमंडळात जेव्हा शरद पवार यांचा अंतर्भाव झाला, त्या वेळी माझी त्यांना एकच विनंती होती : कृषिविषयक विकासाचा विलक्षण यशस्वी असा ‘बारामती पॅटर्न’ त्यांनी उर्वरित देशातही घडवून आणावा. आपण उभ्या भारताचाच विकास बारामतीच्या धर्तीवर करू शकलो, तर एक राष्ट्र म्हणून आपण उन्नत मानेने जगभर निश्चितपणे वावरू शकू.’