राजकीय क्षेत्रातील अथवा समाजजीवनातील एखादा अवघड पेचप्रसंग असो वा मूलभूत संघर्षाचा एखादा नाजूक, गुंतागुंतीचा प्रश्न असो, व्यापक हिताच्या व सामंजस्याच्या मध्यबिंदूवर आणून समाधानकारक तोडगा काढणारे संकटमोचक म्हणजे फक्त आणि फक्त पवारसाहेबच!
पवारसाहेबांचे राजकीय गुरु यशवंतराव चव्हाण यांच्याशी डॉ.सी.डी.माई त्यांची तुलना करतात, ‘देश ज्यावेळी युध्दाच्या संकटात सापडला होता, तेव्हा वृत्तपत्रात प्रसिध्द झाले होते की, हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला. हे प्रतीक पवारसाहेबांना लावायचे झाल्यास ‘कृष्णा-गोदावरी ही गंगेच्या मदतीला धावून गेली आणि आपण कृषिक्षेत्रातील समस्यांना पुरून उरलो’ असे म्हणायला हरकत नाही. दुसरी हरित क्रांती त्यामुळेच केवळ कागदावर न राहता आपण भूमीवर आणू शकलो.
सर्व पातळींवर संकटकाळात प्रतिकारात्मक सक्रिय हालचाल करून संकटाची तीव्रता कमी करणे हे शरद पवारच करू जाणोत!
१९९३ सालची मुंबईतील दंगल हे याचे ठळक उदाहरण होय. संकटाला परतवून लावण्याची आणि संकटग्रस्तांसाठी ठामपणे उभे राहण्याची पवारसाहेबांची क्षमता अतुलनीय आहे. प्रसारमाध्यमांच्या सहाय्याने अक्षरश: घराघरांत पोहोचून एखाद्या जाणत्या आणि स्वकियाने सांगाव्यात तशा चार समजुतीच्या गोष्टी शरद पवारांनी सांगत सूत्रे हाती घेतल्यावर विदारक दंगलीच्या ज्वाळा आपसुक शमू लागल्या होत्या.
एखादा राजकीय पेचप्रसंग असो, विभागीय दंगल असो वा नुकतीच घडलेली माळीण गावातील दुर्घटना असो, शरद पवारांची हजेरी ही केवळ तोंडदेखली कधीच नसते, तिला कृतिशीलतेचे पाठबळ असते.
त्याचे कारण त्यांच्या बालपणापासूनच्या घडणीत सापडते. ते चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले नाहीत. मात्र सामाजिक मूल्यांप्रती आदर बाळगणारे घराणे असा लौकिक असणाऱ्या एका मोठ्या कुटुंबात पवार यांचा जन्म झाला. अडचणीच्या आर्थिक परिस्थितीतून मार्ग काढीत त्यांनी वाटचाल केलेली आहे. त्यांच्या आईचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव असल्याचे ते मानतात. १९३६ साली ती पुणे लोकल बोर्डावर निवडून आली. आर्थिक परिस्थिती बेताची. धाडस हा तिचा मूलमंत्र होता. हे धाडसच संकटाशी दोन हात करायला शिकवत असते.
संकट जितके मोठे तितकी त्याला तोंड द्यायला आवश्यक असणारी स्थितप्रज्ञता सामान्य माणसांपासून नेत्यांपर्यंत सर्वांना वाढवावी लागते. तसेच तहान लागली की विहीर खणून चालत नाही. आपले नित्य व्यवहार आणि जीवन सुस्थित असण्याचा प्रयत्न संकटकाळात परिस्थिती हाताळण्यास सहाय्यकारी ठरतो. याचे प्रत्यंतर आले जागतिक मंदीच्या काळात!
शरद पवारांच्या बौध्दिक पाठबळावर पोसलेली भारतीय शेती या काळात भारताचा आर्थिक आधार ठरली.
जागतिक आर्थिक मंदीच्या संकटामुळे जगाच्या तुलनेत भारतालाही फटका बसला. परंतु भारताला वाचवले ते भारतीय शेतीने.
शेती, व्यापार आणि त्याला अनुलक्षून असलेले विविध उद्योगधंदे यांमुळे जागतिक मंदीच्या आर्थिक झळा आपल्याला फारशा बसल्या नाहीत. पवारांच्या दूरदृष्टीचा आणि प्रयत्नांचा हा असा परिपाक परिणामांच्या स्वरूपात आपल्याला अनुभवायला मिळाला.
संबंधित बाबीची, घटनेची, परिस्थितीची नस अचूक ओळखणे, ती सापडणे खूप गरजेचे असते. त्यासाठी व्यासंगाची बैठक लाभलेली सूक्ष्म दृष्टी आवश्यक असते. ती पवारसाहेबांनी कमावलेली आहे हे त्यांचे मुख्य वैशिष्ट्य!
जागतिक मंदीचे संभाव्य संकट नजरेसमोर ठेवून काही त्यांनी कृषिविकासाची धुरा खांद्यावर घेतली नव्हती पण संकटकाळात ती तयारी कामी आली एवढे खरे! प्रयत्नांतील सातत्य माणसाला उपयोगी पडते ही खूणगाठ पवारसाहेबांनी कारकिर्दीच्या प्रारंभीच बांधलेली होती. त्याचीच अंमलबजावणी ते नित्य करीत आलेले दिसतात.
उपलब्ध साधन-सामग्रीचा उपयोग करून प्रतिकूलतेतून मार्ग काढा हा विचाराचा ठसा शरद पवार त्यांच्या आचारातून जनमानसावर बिंबवतात, म्हणूनच सर्वसामान्य जनतेला ते संकटकाळी धावून येणारे संकटमोचक वाटतात.
पवारसाहेब म्हणजे महाराष्ट्राच्या सुख दु:खात सहभागी झालेले नेतृत्व आहेत. दुष्काळ पडला तर मदतीला उभे राहिले शरद पवार! लातूरला भूकंप झाला तेथे उभे राहिले शरद पवार! अतिवृष्टीने विदर्भ अडचणीत आला उभे राहिले शरद पवार!
तेव्हा मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. पवारसाहेबांना ही गोष्ट समजल्यानंतर त्यांनी तीन दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांचा दौरा केला. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन पाहणी केली. जिल्हाधिकाऱ्यांना सर्वेक्षणाच्या सूचना दिल्या. ते रिपोर्ट घेऊन पंतप्रधानांची भेट घेतली. नुकसानीची माहिती दिली आणि मदतीचा आग्रह धरला. पवारसाहेबांच्या प्रयत्नांमुळेच विदर्भातील शेतकऱ्यांना केंद्रशासनाच्या माध्यमातून ९२१ कोटी रुपयांची मदत मिळाली.
अशी कितीतरी उदाहरणे………