महत्वाकांक्षी योजना

उज्ज्वल भवितव्यासाठी शरद पवारांनी सुचविलेले ठाम उपाय म्हणजे

  • समाजातील उपेक्षित घटकांना प्रथम शिक्षण
  • पुढारलेल्या समाज घटकांबरोबर त्यांना आणण्यासाठी सवलती
  • सामाजिक न्यायाच्या संकल्पनेची अंमलबजावणी
  • कृषीक्षेत्राचा विकास

या एकेका उद्दिष्टाची व्याप्तीच मुळी अमर्याद आहे. त्यासाठी अथक प्रयत्नांची आवश्यकता आहे आणि स्वत: शरद पवार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि संबंधितांची त्यासाठी झटण्याची कायम तयारी आहे.

शेतकरी शेती आणि शरद पवार – एक सुरेल सरगम

ऍग्रिकल्चरल सायंटिस्ट रिक्रूटमेंट बोर्डाचे माजी अध्यक्ष डॉ.सी.डी.मायी शरद पवारांना ‘दुसऱ्या हरित क्रांतीचे जनक’ म्हणतात. पवारसाहेबांशिवाय भारतीय कृषिक्षेत्राचा विचारच अशक्य आहे असे आपले मत त्यांनी ठामपणे मांडले आहे.

पवारसाहेबांच्या कृषीमंत्री पदाच्या कारकिर्दीत पीक उत्पादकता, पतपुरवठा, सहकार, बी-बियाणे, कोरडवाहू शेती, पणन, तंत्रज्ञान, हस्तांतरण, बागायत, मच्छिमारी, पशुधन, कृषीव्यवसाय, मायक्रो इरिगेशन आणि वेअर हाऊसिंग आणि असंख्य विषयांशी संबंधित प्रकल्प व कार्यक्रमांना गती प्राप्त झाली.

पवारसाहेब हे असे एकमेव मंत्री आहेत की ज्यांनी ‘जीएम टेक्नॉलॉजी’ वर सुस्पष्ट भूमिका घेतली असून अन्नसुरक्षेच्या निश्चितीसाठी ते ‘जेनिटिकली मोडिफाइट क्रॉप्स’ चा पुरस्कार करतात. विशेष म्हणजे त्यांच्या दूरदृष्टीने आखलेल्या व्यवहार्य धोरणांमुळे केवळ अन्नधान्याचे उत्पादन वाढलेले नाही तर फळे व भाज्यांच्या उत्पादनातही भरघोस वाढ झालेली आहे. यंदा फळे व भाज्यांच्या उत्पादनाने २५० दशलक्ष टनांचा पल्ला गाठला असून राष्ट्रीय फळबागायत अभियानाचे लक्ष्य आपण लवकरच गाठू शकू अशी चिन्हे आहेत.

गेल्या काही काळात शरद पवारांनी –

  • राष्ट्रीय कृषीविकास योजना
  • राष्ट्रीय बांबू अभियान
  • एकात्मिक अन्न कायदा
  • राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान
  • माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या मदतीने देशात सर्वदूर कॉमन सर्व्हिस सेंटर्सची उभारणी

असे अनेक क्रांतिकारी कार्यक्रम हाती घेतले आणि कृषीक्षेत्राचा सारा चेहरामोहराच बदलून टाकला.

विकासासाठी प्रयत्नशील असलेला हा जाणता लोकनेता एकांगी विचार कधीच करत नाही. त्यांचे लक्ष सर्वदूर असते. प्रश्न-समस्या-संकटकाळात मदतीचा हात लागतो याचे त्यांना कायम भान असते. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्येसंदर्भाने ते हेलावून जातात. मदतीच्या मर्यादांची त्यांना जाणीव आहे. संकटग्रस्त शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी अनेक धोरणात्मक निर्णयांची आवश्यकता आहे असे ते म्हणतात.

महिला सुरक्षितता, शिक्षण यांबाबतीत मदत मिळण्यासाठी प्रदेश कार्यालयातून स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्याबाबत विचार करण्यात येणार आहे. प्रदेश कार्यालयात राज्यभरातील युवतींचे प्रश्न ऐकल्यावर त्यांची नोंद करण्यासाठी प्रसंगी संबंधित मंत्री किंवा सरकारी विभागाकडे त्याचा पाठपुरावा करण्यासाठी एक महिला कर्मचारी नेमण्यात येणार आहे.

24 डिसेंबर 2013 रोजी राष्ट्रवादी भवनाचे उद्‌घाटन श्री शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते म्हणाले, ‘‘या जिल्हयातील सामान्य माणसाला त्याचे प्रश्न सोडविण्याचे हक्‍काचे ठिकाण हे ‘राष्ट्रवादी’ भवन झाले पाहिजे. यामध्ये सगळयांचे प्रश्न हाताळले जातील.’’

शेतकऱ्यांच्या हिताचा विचार, कामगारांच्या हिताचा विचार, महिलांच्या प्रश्नांची सोडवणूक, युवक-युवती, विद्यार्थी यांच्या प्रश्नांची सोडवणूक, वेगवेगळ्‌या क्षेत्रातील लोकांचे प्रश्न सोडविण्याचे हे केंद्र करणे असे यामागचे महत्व आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आगळे-वेगळेपण

कोणत्याही लोकशाही राष्ट्रात एकापेक्षा अधिक राजकीय पक्ष असतात. एकपक्षीय लोकशाही ही खऱ्या अर्थाने लोकशाही नसते. किमान दोन पक्ष तरी असावे लागतात. दोन चाकांशिवाय गाडी चालू शकत नाही. भारत ही बहुपक्षीय लोकशाही आहे. काही पक्षांना राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे, तर काही प्रादेशिक पक्ष आहेत. प्रादेशिक पक्षांची संख्या बरीच मोठी आहे. प्रादेशिक पक्षांची निर्मिती त्या त्या प्रदेशाच्या अस्मितेतून झालेली आहे. हा देश बहुभाषिक, बहुधर्मीय आणि बहुसांस्कृतिक असल्यामुळे भारतीय समाज हा बहुमुखी समाज आहे. त्या त्या प्रदेशाच्या प्रश्नांचे स्वरूपही वेगवेगळे आहे. आणि हे लक्षात घेऊन १९५६ साली राज्यांची पुनर्रचना करण्यात आली होती. मुख्यत: ती भाषिक तत्त्वावर झाली होती.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना १० जून १९९९ रोजी करण्यात आली. त्याला राष्ट्रीय पक्ष म्हणून निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. त्याची निर्मिती कॉंग्रेस पक्षातून झाली आहे आणि म्हणून तो कॉंग्रेस पक्षाशी साधर्म्य ठेवतो. त्याचा तोंडवळा हा कॉंग्रेस पक्षाचा तोंडवळा आहे. तथापि तो निराळा आहे. मा.शरच्चंद्र पवार यांचे कॉंग्रेसच्या नेतृत्वाशी काही मुद्द्यांवर वैचारिक मतभेद झाले. त्यांच्याबरोबर संगमा व तारीक अन्वर हे दोन नेते होते. या तिघांना कॉंग्रेस पक्षातून काढण्यात आले. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली. अशा प्रकारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा स्वाभिमानातून अस्तित्वात आला. धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे लक्ष्य व धोरण आहे.
देशाचे ऐक्य धर्मनिरपेक्ष लोकशाहीच्या विकासातूनच साध्य होऊ शकते अशी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची धारणा व निष्ठा आहे. धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अस्मितेचा स्रोत आहे.

राष्ट्रवादीचे दुसरे वैशिष्ट्य असे की त्याचे स्वत:चे आर्थिक धोरण तर आहेच, पण सामाजिक धोरणदेखील आहे. सर्वसमावेशक समाजाची निर्मिती हे त्याचे लक्ष्य व उद्दिष्ट आहे. जाती-पातींच्या, धर्म-संप्रदायांच्या भिंती त्याच्या भोवती नाहीत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष मा.शरच्चंद्र पवार यांनी ते अनेक ठिकाणी व अनेक प्रसंगी असंदिग्ध शब्दांत व्यक्त केले आहे. राजकारण हे राजकारणासाठी नाही असता कामा नये. ते समाजकरणाचे व अर्थकरणाचे साधन आहे. लोकांना सामाजिक न्याय व आर्थिक न्याय मिळाला पाहिजे, आणि त्यासाठी राजकीय सत्तेचा वापर केला पाहिजे, हे राष्ट्रवादीचे ध्येय आणि धोरण आहे. समाज परिवर्तन हे राष्ट्रवादीचे उद्दिष्ट आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा प्रतिगामी शक्तींच्या विरुध्द उभा आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा वैचारिक पाया अगदी भक्कम आहे. पवारसाहेब हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख संस्थापक आणि शिल्पकार आहेत. त्यांचे नेतृत्व आणि कर्तृत्व अगदी अतुलनीय आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद त्यांनी चारदा भूषविले आहे. मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य केल्या आणि इतर मागासवर्गीयांना न्याय दिला. महिला धोरणाची निर्मिती त्यांनी केली आणि महिलांना विकासाची संधी उपलब्ध करून दिली, मराठवाडा विद्यापीठाला, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव दिले आणि दलित अस्मितेचा आदर केला. ज्या गोष्टी कॉंग्रेसच्या नेतृत्वाला करता आल्या नाहीत, त्या त्यांनी केल्या. राजकारणाला त्यांनी सामाजिक आशय दिला आणि म्हणून त्यांचे राजकारण अर्थपूर्ण व अर्थवाही ठरले. त्यांच्या विचारांचा व कार्याचा वारसा राष्ट्रवादीला मिळाला आहे. आणि म्हणून शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष म्हणजे शरद पवार असे समीकरण झाले आहे. पण कोणतीही संस्था ही तिच्या संस्थापकाच्या पुढे जायला पाहिजे. पक्ष हा व्यक्तीकडून समष्टीकडे जायला हवा.

८० टक्के समाजकरण आणि २० टक्के राजकारण असे सूत्र समोर ठेवून हा पक्ष काम करतो आहे. लोकशाही ही तीन आयामी संकल्पना आहे. राजकीय, सामाजिक आणि आर्थिक असे ते तीन आयाम आहेत. स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता व सामाजिक न्याय या पंचतत्त्वातून भारतीय लोकशाहीची निर्मिती झालेली आहे. लोकशाहीची ही पाच महामूल्ये आहेत. ते राज्यघटनेच्या प्रास्ताविकात अधोरेखित करण्यात आले आहेत.

राष्ट्रवादीने आजपर्यंत आयोजित केलेल्या चिंतनशिबिरांतून, चर्चासत्रांतून, मेळाव्यांतून व अधिवेशनांतून तिची विचारसरणी व कार्यप्रणाली स्पष्ट झाली आहे.

देशात सांप्रदायिक शक्ती वाढू नयेत याची राष्ट्रवादीने प्रकर्षाने काळजी घेतलेली आहे आणि त्यासाठीच हा पक्ष केंद्रात व राज्यात कॉंग्रेस व इतर धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांच्या आघाडीत सामील झाला आहे.

महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष यांच्यामध्ये अनेकदा ताणतणाव निर्माण झाले. पण सरकार अस्थिर होईल असे पाऊल राष्ट्रवादीने कधी उचलले नाही. आजही पवारसाहेबांचे असे मत आहे की कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांनी आघाडी करूनच निवडणुका लढवल्या पाहिजेत. धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्रित आल्याशिवाय सांप्रदायिक शक्तींना तोंड देणे कठीण आहे. स्वबळाची भाषा वापरली तरी स्वबळावर कोणत्याही पक्षाला निवडणुका लढवून सत्ता प्राप्त करणे शक्य नाही.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने दलित, अल्पसंख्याकांच्या, महिलांच्या प्रश्नांकडे विशेष लक्ष दिले आहे. दलितांच्या हातात त्यांच्या अधिकारांची सनद देणारा हा कदाचित भारतातला पहिलाच पक्ष असावा.

‘राजकारण एके राजकारण’ हा पाढा तो वाचीत नाही. स-मा-ज-का-र-णा-सा-ठी रा-ज-का-र-ण ही मुळाक्षरे गिरवणारा हा पक्ष आहे. पण हा ध्येयवाद केवळ बोलण्यासाठी नसून आत्मसात करण्यासाठी आहे हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या आकलनात आले पाहिजे. कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते आपल्या पक्षाचा कार्यक्रम प्रयत्नपूर्वक राबवतात. पक्षाच्या पाठीचा कणा म्हणजे त्याचे कार्यकर्ते! आणि म्हणून कार्यकर्त्यांची एकजूट, त्यांच्यातली शिस्त, त्यांचा लोकसंपर्क, पक्षाचे ध्येय-धोरण समजावून देण्याची त्यांची क्षमता, या गोष्टींवर पक्षाचे भवितव्य अवलंबून असते.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने अभिनव असा एक कार्यक्रम हाती घेतला आहे. राज्यभरातून तरुण वत्तयांची निवड करून त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम त्याने चालू केले आहे.

‘गाव तिथे राष्ट्रवादी’ हे सूत्र समोर ठेवून पक्ष नेतृत्व काम करू इच्छिते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा प्रत्येक गावापर्यंत, वाडी व तांड्यापर्यंत पोहोचला पाहिजे. कार्यकर्त्यांनी त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. केवळ शहरात काम करून चालणार नाही. ग्रामीण भागात देखील पक्षकार्यकर्त्यांचे जाळे पसरले पाहिजेत. समाजातील सर्व जाती-धर्माचे घटक पक्षात आले पाहिजेत. सगळ्यांनाच हा पक्ष आपला आहे आणि आपल्यासाठी काम करतो आहे असे वाटले पाहिजे. विविध समाज घटक व व्यवसायातील लोकांचा समावेश पक्षात झाला पाहिजे. तसा प्रयत्न करण्यात आलेला आहे, येत आहे. पक्षाची कार्यकारिणी आणि पक्षाचे अनेक कक्ष लक्षात घेतले तर त्याची व्याप्ती आपल्या नजरेत येईल. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा बहुभाषिक, बहुधार्मिक व बहुसांस्कृतिक अशा भारतीय समाजाचा आडवा छेद आहे. हा पक्ष तरुण तरुणींपासून अधिक अपेक्षा बाळगतो. राष्ट्रीय भवितव्य देशातील तरुणाईवर अवलंबून आहे असे त्याला वाटते. Reach and Enrich  हे त्याचे ब्रीद आहे.