भारतातील अग्रगण्य राजकीय नेत्यांमध्ये शरद पवार यांची गणना होते. सार्वजनिक जीवनातील त्यांच्या अनुकरणीय अशा कारकिर्दीने स्वातंत्र्योत्तर भारतातील चार दशकांचा कालखंड पाहिला. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने २००४ साली सत्ता ग्रहण केली. या सरकारमधील कृषी, ग्राहक व्यवहार आणि अन्न पुरवठा व सार्वजनिक वितरण मंत्रालयाची जबाबदारी पवारांकडे सोपवण्यात आली. १९९९ साली त्यांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष संयुक्त पुरोगामी आघाडीचा घटकपक्ष आहे. यापूर्वीही, देशाचे संरक्षणमंत्री, लोकसभेतील विरोधी पक्षनेते, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष यांसारखी पदे त्यांनी सांभाळली. १९७८ साली, वयाच्या ३८ व्या वर्षी पवार जेव्हा पहिल्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले त्यावेळी देशातील सर्वाधिक तरुण मुख्यमंत्री हे बिरुद त्यांना लाभले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद त्यांनी एकूण चार वेळा भूषविले.
१९६० साली अस्तित्वात आलेल्या महाराष्ट्र राज्याचे शिल्पकार असा ज्यांचा गौरव होतो ते यशवंतराव चव्हाण पवार यांचे मार्गदर्शक-गुरु. जागतिक स्तरावरील बदलत्या आर्थिक वातावरणाचा अचूक वेध भारतातील ज्या राजकीय नेत्यांनी सर्वप्रथम घेतला त्यांत पवारांचा समावेश होतो. नव्याने सामोर्या येणाऱ्या वैश्विक आव्हानांना सामोरे जाण्याच्या दृष्टीने त्यांनी बारामती या मतदारसंघाची मनोभूमिका बनविली. आर्थिक उदारीकरणाचे पुरस्कर्ते असल्याने त्यांनी अवर्षणप्रवण बारामतीचे रूपांतर दर्जेदार, उच्च शिक्षणाच्या केंद्रामध्ये घडवून आणले. विज्ञान तसेच कृषिक्षेत्रातील संशोधनाच्या उत्तम संधी आज तेथे उपलब्ध आहेत.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नेहरू सेंटर, साताऱ्याची रयत शिक्षण संस्था यांसारख्या अनेक सांस्कृतिक तसेच शैक्षणिक संस्थांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.