‘दुसरी हरितक्रांती’ – शरद पवार यांच्या कृषी व संबंधित विषयांवरील भाषणांचे पुस्तक प्रकाशित झाले.
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर त्याविषयी म्हणतात, ‘यातील सर्व भाषणांतून सरांचा-पवारसाहेबांचा संख्यात्मकतेपेक्षा गुणात्मक वाढीवर असलेला भर दिसून येतो. ‘ज्ञानाधारित कृषिविकास’ हे त्यांचे ध्येय राहिले. पारंपरिक व आधुनिक ज्ञान यांना एकत्रित करून पुढे जायचे; असा त्यांना अट्टाहास असतो. शेतकरी जीवनाच्या प्रयोगशाळेत काम करीत असतो. तो स्वत: संशोधन करू शकतो यावरचा सरांचा विश्वास या पुस्तकात दिसून येतो.
‘दुसरा एक मुद्दा सर पुस्तकात मांडतात. तो म्हणजे शाश्वत अन्न सुरक्षा आणि त्यासाठी कृषिविकास. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतीकडे केवळ उपजीविकेचे साधन म्हणून न पाहता आर्थिक सुरक्षिततेसाठी शेती या दृष्टिकोनातून पाहायला पाहिजे, सर्वसमावेशक आर्थिक वाढीचे साधन म्हणून पाहायला पाहिजे: आर्थिक उद्दिष्ट, अन्न सुरक्षा, पोषणाचे उद्दिष्ट असे नवीन दृष्टिकोन ठेवायला पाहिजेत असे ते म्हणतात.’
‘या अभ्यासपूर्ण भाषणांच्या पुस्तकातून आपल्याला शेतकरी शरद पवार दिसतात, शास्त्रज्ञ शरद पवार दिसतात, अत्युच्च विचारवंत शरद पवार दिसतात; नवसर्जनशील शरद पवार दिसतात. त्यांची अनुकंपा ठायी ठायी दिसते. ते अल्पभूधारक शेतकऱ्यांविषयी लिहितात, महिलांविषयी लिहितात. भारतातील ६०% श्रमशक्ती स्त्रियांकडून येते असे त्यांनी नोंदले आहे.’
माशेलकर शरद पवारांना ‘नव्या तंत्रज्ञानाचे चॅम्पियन’ म्हणतात. पवारसाहेबांच्या पुस्तकाचा म्हणजेच एका अर्थाने त्यांच्या विचारांचा मथितार्थ माशेलकर असा मांडतात.
‘कष्टाळू शेतकरी, बुध्दिमान वैज्ञानिक, सक्षम प्रशासन, राजकीय इच्छाशक्ती आणि ज्ञानिधिष्ठित समाज या पाच गोष्टी एकत्र आल्या तर भारताला आपण जगातील एक कृषी महाशक्ती बनवू शकतो.’